मुंबईमधील करोनाबाधितांमध्ये गुरुवारी १५ जणांची भर पडली. त्यामुळे मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी चार रुग्ण हे शहरातील वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधील आहेत. त्यामुळेच आता करोना मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये हातपाय पसरु लागल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईमधील झोपडपट्ट्यांमध्ये विलगीकरणामध्ये राहणे, सोशल डिस्टन्सींग ठेवणे शक्य होणार नसल्याने झोपडपट्टीमध्ये करोनाचे रुग्ण अढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार घाटकोपरमधील झोपडपट्टीमध्ये दोन रुग्ण अढळून आले आहेत. तर इतर दोन रुग्णांपैकी एक रुग्ण कलिना येथील तर दुसरा परळमधील चाळीत अढळून आला आहे. घाटकोपर येथील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या ६८ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे सिद्ध झालं आहे. ही महिला काम करत असणाऱ्या घरातील व्यक्ती परदेशातून आलेली होती. त्या व्यक्तीला करोना झाल्यामुळे त्याचा संसर्ग या महिलेला झाल्याचे सांगितले जात आहे.
नक्की वाचा >> मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलेला करोना, आरोग्य अधिकाऱ्यांची उडाली झोप
२५ वर्षाच्या तरुणाला करोना
घाटकोपरमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा करोना चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आला आहे. करोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आल्याने या तरुणाला रोगाची लागण झाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या महिलेच्या कुटुंबियांचीही करोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्या चाचण्या निगेटीव्ह आल्याने अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. या महिलेच्या कुटुंबियांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने विलगीकरणामध्ये ठेवले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे घर झोपडपट्टीमध्ये अगदी आजूबाजूच्या घरांना लागून असल्याने तिथे तिच्या कुटुंबियांना विलगीकरणामध्ये ठेवणं शक्य नसल्याने त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. हे कुटुंब पुढील चौदा दिवस पालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असणार आहे.
कलीनामधील रुग्ण इटलीवरुन आलाय
कलीनामध्ये अढळून आलेला रुग्ण हा इटलीमधून आला आहे. इटलीमध्ये करोनाने थैमान घातलं आहे. पालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपली चूक झाल्याचे मान्य केलं आहे. कलिना येथील झोपडपट्टीमध्ये राहणारा हा ३७ वर्षीय रुग्ण मार्च महिन्याच्या सुरुवातील भारतात परत आला तेव्हा पालिका अधिकाऱ्यांनी त्याला विलगीकरणामध्ये राहण्यास सांगितले होते. या व्यक्तीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीला विलगीकरणामध्ये राहता येईल का याची पहाणीही पालिका अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी जाऊन केली होती. “कलिनामधील झोपडपट्टीमध्ये हा रुग्ण राहतो. या झोपडपट्टीमध्ये २५ हजार लोकं राहतात. येथील प्रत्येक घरात पाणी येत नाही. येथील रहिवाशांना सार्वजनिक शौचालय वापरावे लागते,” अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. इटलीवरुन परत आलेल्या या व्यक्तीमध्ये काही दिवसांनी करोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची चाचणीही करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
नक्की वाचा >> जो मूर्खपणा इटली, जर्मनी, स्पेन व अमेरिकेच्या नागरिकांनी केला तोच भारतीय करतायत
चौथ्या प्रकरणामुळे अधिकारीही चक्रावले
चौथे प्रकरण तर पालिका अधिकाऱ्यांनाही चक्रावून टाकणार आहे. मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील चाळीत राहणाऱ्या एका महिलेच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला कधीही परदेशात गेलेली नाही. प्रभादेवी परिसरात कॉर्पोरेट कार्यालयाजवळ या महिलेचा भोजन विक्रीचा व्यवसाय आहे. या महिलेकडे येणाऱ्या एखाद्या गिऱ्हाईच्या संपर्कात आल्याने या महिलेला करोनाचा झाल्याची शक्यता पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली. या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या करोना चाचणीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे अशी माहिती जी-दक्षिण वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे. सध्या तरी या महिलेच्या घरातील व्यक्तींना विलगीकरणामध्ये राहण्यास सांगण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेकडून फवारणी
करोनाचा संसर्ग टाळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पालिकेचा कीटक नियंत्रण विभाग, अग्निशमन दलाने पालिकेची रुग्णालये, कार्यालये, अलगीकरण केंद्रे, अलगीकरण सल्ला दिलेली घरे, पॉझिटिव्ह चाचणी असलेली घरे, न्यायालये, सरकारी कार्यालये, पोलीस ठाणी, अन्य कार्यालये, रुग्णवाहिका, शववाहिन्या, सरकारी-पालिकेची वाहने आदीची स्वच्छता आणि र्निजतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही विभागांनी आतापर्यंत १,५२७ ठिकाणी स्वच्छता आणि र्निजतुकीकरण केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
First Published on March 27, 2020 9:51 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-covid-19-cases-detected-in-four-separate-mumbai-slum-clusters-scsg-91-2117114/