मोठय़ा प्रमाणावर येणाऱ्या प्रवाशांसाठी विलगीकरणाची आवश्यकता
मुंबई : येत्या आठ ते दहा दिवसात मुंबईत मोठय़ा प्रमाणात मध्य आशिया अर्थात आखाती देशातून मोठय़ा प्रमाणात भारतीय प्रवासी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये त्यांच्यासाठी मोठय़ा प्रमाणावर विलगीकरण कक्ष तयार करावे लागणार आहेत. या प्रवाशांसाठी मोठय़ा प्रमाणावर विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे आव्हान पालिकेला पेलावे लागणार आहेत.
मुंबईत रोज मोठय़ा संख्येने प्रवासी परदेशातून येत आहेत. त्यापैकी ज्यांना सर्दी तापाची लक्षणे आहेत, अशा प्रवाशांना विलगीकरण कक्षात पाठवले जाते. तर ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत अशा लोकांना घरातच वेगळे राहण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. मात्र येत्या काही दिवसात तब्बल २५ हजार इतक्या मोठय़ा संख्येने मध्य आशियातून अडकलेले प्रवासी मुंबईत येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. मुंबई विमानतळावर येणाऱ्या या प्रवाशांसाठी पालिकेला विलगीकरण कक्ष तयार ठेवावे लागणार आहेत. विलगीकरण कक्ष कुठे कसे स्थापन करता येतील त्याकरिता पालिका सध्या खासगी रुग्णालये, विमानतळाजवळची हॉटेल्स यांच्याशी चर्चा करून युद्धपातळीवर विलगीकरण कक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रुग्णांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. तसेच येथील आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखीनच वाढणार आहे.
खासगी वाहनाने प्रवास
जे प्रवासी पुणे, नाशिक अशा ठिकाणी राहणारे असतील आणि त्यांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांना खासगी वाहनाने घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. पण त्यांना सार्वजनिक परिवहनमधून प्रवास करता येणार नाही. ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळतील किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या चाचण्या करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. तर प्रकृती उत्तम आहे पण मुंबईत घर नाही अशांनादेखील विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. आलेल्या सर्व प्रवाशांच्या हातावर शिक्का मारला जाणार असून कोणालाही विमानाने अन्य शहरात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सुविधा इथे..
* पालिकेने पवईत अभियंत्यांसाठी नुकतेच जे प्रशिक्षण केंद्र उभे केले आहे. त्याच्या नव्या कोऱ्या इमारतीत शेकडो विलगीकरण कक्ष स्थापन केले जाणार आहेत.
* कस्तुरबामध्ये सध्या १०० खाटांची सुविधा असून मरोळच्या सेवन हिल्स रुग्णालयात ३०० खाटांची सोय आहे.
* या व्यतिरिक्त खासगी रुग्णालयांशी चर्चा करून तिथेही काही कक्ष तयार केले जाणार आहेत. आतापर्यंत ९० कक्ष मिळू शकलेले आहेत.
* त्याचबरोबर विमानतळाच्या आसपासच्या हॉटेलमध्येही पैसे भरून कक्ष उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
महिनाभर धोका कायम
आठ दहा दिवस टप्प्याटप्प्याने मोठय़ा संख्येने येणाऱ्या या प्रवाशांची वर्गवारी केली जाणार आहे. ज्या प्रवाशांची प्रकृती उत्तम आहे, ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत आणि ज्यांचे मुंबईत घर आहे अशा लोकांना घरी पाठवण्यात येणार असून त्यांना १४ दिवस त्यांच्याच घरात वेगळे राहण्याच्या सूचना देण्यात येणार आहे. त्यामुळे ‘होम आयसोलेशन’च्या प्रवाशांची संख्या वाढणार असून त्यांनी काळजी न घेतल्यास मात्र धोका वाढू शकतो.
First Published on March 20, 2020 4:00 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-26000-indians-return-from-gulf-countries-to-mumbai-soon-zws-70-2111818/