मुंबई बातम्या

#COVID 19 : IIT Bombay मध्ये आला ई-मेल, वसतिगृहातील सर्व खोल्या करा खाली – Sakal

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आयआयटी मुंबई , समाजकल्याण विभाग आणि मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वसतिगृहे सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. अभ्यासासाठी थांबणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अटींवर परवानगी दिली असली, तरी त्यांची गैरसोय होणार आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आयआयटी प्रशासनाने 31 मार्चपर्यंत सर्व विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत (ता. 20) खोल्या सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी घरी जाण्याची तयारी सुरू केली आहे. परदेशी आणि वैद्यकीय कारणांमुळे घरी जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिष्ठात्यांची परवानगी घेऊन वसतिगृहात राहता येईल. बाहेरील व्यक्तीला 18 ते 31 मार्च या कालावधीत आयआयटीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

Inside Story : कोरोनाची दहशत आणि पॅरासिटामॉलची गोळी….

समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील वरळी, जोगेश्‍वरी आणि चेंबूर येथील वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार काही विद्यार्थी गावी गेले आहेत. एप्रिलच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात परीक्षा असलेले विद्यार्थी वसतिगृहांमध्ये थांबले आहेत. तेथील मेस बंद ठेवण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. वरळीतील वसतिगृहात अभ्यासासाठी थांबलेल्या 20 ते 25 विद्यार्थ्यांना आता हॉटेलांचा आधार घ्यावा लागेल. 

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात महाविद्यालयाने दिलेला प्रकल्प सादर करायचा आहे. त्यामुळे वसतिगृहात राहूनच अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. इतर विद्यार्थी गावी गेल्यामुळे मेस बंद होणार असल्याने जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे; परंतु परीक्षा महत्त्वाची असल्याने थोडी गैरसोय सहन करावी लागेल, असे वसतिगृहातील विद्यार्थी भगवान बोयल यांनी सांगितले. 

Inside Story ‘ती’ एक टॅक्सी ‘कोरोना’ घेऊन फिरत होती मुंबईच्या रस्त्यांवरून…

“वसतिगृह सोडण्याची सक्ती नाही’ 

गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठे आणि महविद्यालयांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात, त्यांना गावी जाण्यासाठी तिकीट मिळेपर्यंत वसतिगृहात थांबू द्यावे. त्यांची गैरसोय होता कामा नये, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. परदेशी आणि गावी जाणे लगेच शक्‍य नसलेले विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्यास आवश्‍यक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांना विश्‍वासात घेऊन सहकार्य करावे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. 

students of IIT bombay received email to vacant hostel rooms due to novel corona 

 

Source: https://www.esakal.com/mumbai/students-iit-bombay-received-email-vacant-hostel-rooms-due-novel-corona-271751