दुबईहून ५ मार्च आलेल्या संबंधित ज्येष्ठ नागरिकाला करोना झाल्याचे निदान झाल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू झाले. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. त्यांना उच्च रक्तदाब होता. पुढे करोनासह न्यूमोनियाची लागण झाली. काही दिवसांनी त्यांचे हृदयाचे ठोके वाढले व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अखेर त्यांना व्हेण्टिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. दरम्यान, मंगळवारी पालिकेच्या ‘एन’ विभागात ४९वर्षीय व्यक्तीलाही करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. ही व्यक्ती ७ मार्च रोजी अमेरिकेहून भारतात परतली होती. त्यानंतर त्यांना कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आले. भारतात आल्यानंतर ते ११ जणांच्या संपर्कात आले होते. त्यापैकी चौघांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या करोना संशयित रुग्णांची संख्या मंगळवारी ६०० झाली आहे. यापैकी ५४० जणांना करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उपचारानंतर ४७६ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. तर, ८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील २६वर्षीय तरुणालाही करोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. हा तरुण अमेरिकेहून दुबईला गेला होता. दुबईहून तो मुंबईत परतला व तेथून पुण्यात आला. त्याला भोसरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात लागण झालेल्यांची संख्या १७ झाली आहे. यामध्ये पुण्यातील सात व पिंपरी-चिंचवडमधील दहा रुग्णांचा समावेश आहे.
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/first-death-in-mumbai/articleshow/74679993.cms