मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांना जलवाहतुकीद्वारे जोडण्यासाठी हॉवरक्राफ्टचा विचार सुरू आहे. अलीकडेच शिष्टमंडळाने रशियाचा दौरा करून चर्चा केली. करोना संसर्गामुळे या प्रक्रियेला खीळ बसली असली तरी ही परिस्थिती निवळताच प्राधान्याने मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक, हॉवरक्राफ्ट सेवा हे विषय प्राधान्याने हाताळले जातील, असे केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय यांनी जाहीर केले.
मुंबई (भाऊचा धक्का)-मांडवा रो-रो सेवा रविवारी सुरू झाली. या सेवेचे उद्घाटन मुंबई मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. रामास्वामी यांनी मांडवा येथे केले. तत्पूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी भाऊचा धक्का येथे एमटूएम (मुंबई टू मांडवा) रो-रो सेवेसाठी सज्ज प्रोटोपोरेस बोटीला भेट दिली.
मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतुकीसाठी १२ मार्ग निश्चित केले असून त्यावरही २०२२पूर्वी सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले. या वेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया उपस्थित होते.
सुरुवातीला रो-रो सेवेद्वारे १४५ लहान, मध्यम व मोठय़ा आकाराची (प्रवासी बस वगळून) वाहने आणि ५०० प्रवासी मुंबई-मांडवा प्रवास करू शकतील. ही बोट मुंबई-मांडवा दरम्यानचे अंतर ४० ते ४५ मिनिटांत कापेल.
पावसाळ्यात गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा किंवा भाऊचा धक्का ते रेवसदरम्यान चालणाऱ्या प्रवासी बोटी, कॅटामरान सेवा बंद ठेवल्या जातात. मात्र प्रोटोपोरोसची रो-रो सेवा पावसाळ्यातही सुरू असेल. सध्या या बोटीच्या चार फेऱ्या होतील.
वेळ वाचणार
रो-रो सेवेचे दर जास्त असून ते नेहमीच्या प्रवासासाठी परवडणारे नाही. मात्र मुंबईहून अलिबाग प्रवासासाठी खराब रस्ते आणि पेण, वडखळ नाका येथे नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे चार तासांहून अधिक वेळ लागतो. रो-रोमुळे वेळ वाचेल, इंधन बचतही होईल हे निश्चित, अशी प्रतिक्रिया ठाण्याला राहणारे शिल्पकार केदार घाटे यांनी नोंदवली.
रो-रो सेवेची वैशिष्टय़े
* या सेवेसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून मांडवा जेट्टी येथे १५० कोटी रुपये खर्चून सुविधा निर्माण केल्या आहेत.
* भाऊचा धक्का येथील जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत करण्यात आले तर मांडवा येथील जेट्टीवर टर्मिनलचे बांधकाम महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत करण्यात आले आहे.
* केंद्र शासनाची सागरमाला योजना आणि राज्य शासनाकडून ५०-५० टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
* रो रो सेवेसाठी www.msmferries.com या संकेतस्थळावर आरक्षण करता येईल. १९ मार्चपासून हे संकेतस्थळ सुरू केले जाईल.
सेवेचे दर
* सर्वसाधारण व्यवस्था – २२५ रुपये प्रतिप्रवासी
* वातानुकूलित आसन व्यवस्था – ३३५ रुपये प्रतिप्रवासी
* व्हीआयपी लाउंज – ५५५ रुपये प्रतिप्रवासी
* छोटी वाहने – ८८० रुपये
* मध्यम वाहने – १३२० रुपये
* मोठी वाहने – १७६० रुपये
* दुचाकी – २२० रुपये
* सायकल – ११० रुपये
* मिनी बस – ३३०० रुपये
* बस – ५५०० रुपये
First Published on March 16, 2020 1:01 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/hovercraft-idea-to-connect-mumbai-thane-navi-mumbai-by-shipping-abn-97-2108020/