परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा हातात उत्तरपत्रिकेऐवजी टॅब दिला जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना साध्या पेनऐवजी इलेक्ट्रिक पेनने पेपर लिहिता येणार आहे… हे कोणत्या परदेशातील विद्यापीठाच्या परीक्षेचे वर्णन नसून ते आहे मुंबई विद्यापीठाच्या आगामी परीक्षेचे!
तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर करून मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन मूल्यांकन सुरू केले. आता याही पुढे जाऊन विद्यापीठ थेट टॅबवरून परीक्षा घेणार आहे. याचा प्रयोगिक वापर येत्या एप्रिलमध्ये विद्यापीठाच्या परीक्षेत होणार आहे. यासाठी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याकडे मुंबई विद्यापीठाचा कल असतो. यात एक पाऊल पुढे राहत विद्यापीठाने येत्या एप्रिलपासून परीक्षा ऑनलाइन घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे कागदाची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून त्याचे मूल्यांकनही वेळेवर होणे शक्य होईल. मुंबई विद्यापीठाने मागील वर्षी याबाबत घोषणा केली होती. आता येत्या एप्रिलमध्ये याचा प्रत्यक्षात वापर सुरू होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांना स्मार्ट परीक्षेचा अनुभव घेता येणार आहे. विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीच्या एमएच्या चौथ्या सत्राची एप्रिलमधील परीक्षा या नव्या पद्धतीने घेतली जाईल.
विद्यार्थ्यांना या परीक्षेचा सरावा व्हावा तसेच त्यांना उत्तर लिहिताना अधिकचा वेळ लागू नये यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्राध्यापकांनाही याचा वापर नेमका कसा करायचा, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर नुकतीच एक ‘मॉक’ चाचणीही घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्याचा सरावही देण्यात आला आहे, असे विभागातील प्रा. डॉ. सुरेश मैंद यांनी सांगितले.
अशी होणार परीक्षा
तंत्रज्ञानाचा आधार घेत विद्यापीठाचे कामकाज कागदविरहित करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून परीक्षाही कागदविरहित करण्यात येणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळात लॉगइन केल्यावर त्यांच्या नावे संबंधित प्रश्नपत्रिका खुली होते. ही प्रश्नपत्रिका वाचून विद्यार्थी तेथेच उत्तरे लिहू शकणार आहेत. उत्तरे लिहून पूर्ण झाल्यावर खाली असलेले सबमिट बटण दाबून विद्यार्थी उत्तरपत्रिका सबमिट करू शकेल, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. ही प्रक्रिया विद्यार्थीसुलभ असून याचा प्रयोग येत्या परीक्षेत अर्थशास्त्र विभागात करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
COVID-19: महारोगराई म्हणजे काय?
आता मार्कशीटवर ग्रेडसह दिसणार टक्केही
पुणे विद्यापीठाच्या ‘सिनेट’वर टांगती तलवार
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/on-the-test-tab-we-will-use-an-electric-pen-instead-of-a-simple-pen/articleshow/74599878.cms