अधिक जागा उपलब्ध करून देण्याची संभाव्य निविदाकारांची माहिती; निविदा सादर करण्यास २० मार्चपर्यंत मुदत
मुंबई : ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’मार्फत उभारल्या जाणाऱ्या ‘मुंबई आय’साठी निविदांची मुदत वाढवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठीची प्रस्तावित जागा अपुरी असल्यांचे संभाव्य निविदाकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबविण्यासाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याची गरज प्रकल्प उभारण्यात स्वारस्य असणाऱ्यांनी व्यक्त केली होती. पण त्यावर अद्याप कसलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान, ६ मार्चची मुदत आता २० मार्च करण्यात आली आहे.
लंडनची ओळख असलेल्या ‘लंडन आय’सारखेच वांद्रे रेक्लमेशन एरिया येथे ‘मुंबई आय’ उभारण्याची एमएमआरडीएची योजना आहे. त्यासाठी जानेवारी महिन्याच्या अखेरीस स्वारस्य निविदा काढण्यात आली. तर फेब्रुवारी महिन्यात सुमारे २३ जणांनी निविदापूर्व बैठकीत सहभाग घेतल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, स्वारस्य निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत ६ मार्चवरून २० मार्च केली आहे. ‘प्रकल्पासाठी अधिक चांगला सहभाग मिळावा यासाठी ही मुदत वाढवल्याचे एमएमआरडीएच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वारस्य निविदानंतर प्रकल्पाची रूपरेषा नक्की होईल. मूळ अंतिम मुदतीपर्यंत निविदाला कसा आणि किती प्रतिसाद होता ही माहिती सांगण्यास मात्र अधिकाऱ्यांनी असमर्थता व्यक्त केली.
‘मुंबई आय’ प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून एक एकर जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे, मात्र संभाव्य निविदाकारांनी एक एकरपेक्षा अधिक जागेची अपेक्षा निविदापूर्व बैठकीत व्यक्त केली होती. तसेच प्रकल्पाच्या व्यावसायिक मूल्यांकनाबद्दलदेखील अनेक प्रश्न आणि सूचना या बैठकीत करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर प्रकल्पाची यंत्रसामग्री आयात करण्यासाठी सवलत मिळण्याची अपेक्षादेखील या बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. या बैठकीत रिलायन्स इन्फ्रा, एस्सेल वर्ल्ड आणि अन्य कंपन्यांनी भाग घेतला होता.
महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दाखवल्यावर एमएमआरडीएने जानेवारीत स्वारस्य निविदा मागवल्या होत्या. यापूर्वी २००६ मध्ये हा प्रकल्प महापालिकेकडून प्रस्तावित होता. मात्र त्यानंतर त्याबाबत फारशी हालचाल झालेली नव्हती. ‘मुंबई आय’ची उंची सुमारे ६३० फूट असेल. सध्या याबाबत स्वारस्य निविदांची प्रक्रिया सुरू असून, त्यास मिळणाऱ्या प्रतिसादानंतर प्रकल्पाबाबत सविस्तर अहवाल तयार होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
First Published on March 12, 2020 12:04 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/bandra-railwaymenshion-mumbai-i-tender-akp-94-2105115/