करोनाच्या सावटाखाली होळी साजरी होत असताना मुंबईत तब्बल ३८ जणांवर वेगवेगळ्या कारणांसाठी पालिकेच्या तिन्ही प्रमुख रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. केईएममध्ये नऊ जणांवर, नायरमध्ये सहा आणि लो. टिळक रुग्णालयामध्ये एकूण २३ जणांवर उपचार करण्यात आले. केईएममध्ये एकावर अद्याप उपचार सुरू आहेत. जे. जे. रुग्णालयामध्ये बारा जखमी आले होते, त्यातील दोघांना दाखल करून घेण्यात आले. इतरांना पडल्यामुळे जखमा झाल्या होत्या, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
डोके, हातापायाला दुखापत, हनुवटीला मार, डोळ्याला दुखापत आणि भाजण्याच्या कारणामुळे ३८ जणांवर पालिका रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. नायर आणि लो. टिळक रुग्णालयामध्ये प्रत्येकाला ओपीडीमध्ये उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती तिन्ही पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली. दरम्यान, या जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. लो. टिळक रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या २३ जखमींमध्ये १० लहान मुलांचा समावेश आहे. केईएममध्ये पाच मुलांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
करोनाचे पडसाद
करोनाच्या धास्तीमुळे विविध क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असताना होळी व धुलिवंदन सणाला आणि पर्यायाने या सणांवर अवलंबून असलेल्या हंगामी व्यावसायांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागल. मुंबईतील अनेक भागांत करोनाच्या पार्श्वभूमीवर पाण्याने धुळवड न खेळण्यावरच भर दिल्याचे चित्र दिसले. काही ठिकाणी फक्त रंगाच्या मदतीने या सणाचा आनंद घेतला गेला. एकूणच यंदाची होळी, धुलिवंदन करोनाला घाबरतच साजरे झालेले पाहायला मिळाले. सध्या जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या सूचनावलीत एखाद्या ठिकाणी गर्दी करू नये अशा सूचनेचाही समावेश आहे. यामुळे मुंबईत दरवर्षी दिसणारा उत्साह यंदा दिसला नाही. काही ठराविक भागांत पाण्याने धुळवड खेळण्यात आली. लहान मुलांना प्राधान्याने धुळवडीपासून लांब ठेवण्यात आले.
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/38-injured-during-holi-celebration-in-mumbai/articleshow/74566848.cms