मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतील हार्बर मार्ग हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. हार्बरचा प्रवास एका रेषेत घडत नाही. नागमोडी, वळणावळणांचा हा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होऊन कोकणाचं प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेल स्थानकात संपतो. हा प्रवास डोळसपणे अनुभवल्यास अनेक गोष्टी, मुंबईची बहुविध, बहुरंगी जीवनशैली, या शहराची सर्वसमावेशकता दृष्टीस पडते.
@bhatkhandeaniMT
मुंबईची जीवनरेखा असणाऱ्या उपनगरीय रेल्वेतील हार्बर मार्गाचा प्रवास एका रेषेत घडत नाही. सीएसएमटी-पनवेलदरम्यान तब्बल २५ स्थानकं आहेत. ५१ किलोमीटरचं हे अंतर कापण्यासाठी हार्बर ट्रेनला ८० मिनिटं लागतात. हार्बर ट्रेनमध्ये स्थानापन्न झाल्यानंतर कोण, कशासाठी, कोठे निघाला आहे हे लक्षात येऊ शकतं. अत्तरं, सुकामेवा आणि अन्य घाऊक सामानाची मशिद बंदर येथून खरेदी करून परतणारे व्यापारी, फॅशन स्ट्रीट, गेट वे ऑफ इंडिया आदी ठिकाणी जिवाची मुंबई करून परतणारे हौशी मुंबईकर (नवी मुंबईकरही), विराट कोहली किंवा बुमराह होण्याची स्वप्नं पाहणारे आणि आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान आदी ठिकाणी घाम गाळणारे होतकरू क्रिकेटपटू, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी आणि अर्थातच नोकरदार या सर्वांना हार्बर ट्रेन सामावून घेते व इच्छित स्थळी सुखरूप सोडते.
हा प्रवास आधी म्हटल्यानुसार सरळ रेषेत होत नाही. मुंबईची पूर्व किनारपट्टी, खास करून शिवडीचा परिसर व पनवेल हे खरं तर समांतर आहेत. नकाशा पाहिला तर ही बाब सहज लक्षात येते. मात्र मधोमध भलीमोठी खाडी आणि समुद्र असल्यानं हार्बरला लांबचा वळसा घेऊन पनवेल गाठावं लागतं. सीएसएमटी ते वडाळा या प्रवासात जुन्या मुंबईचं दर्शन घडतं. उंचावर असणाऱ्या सँडहर्स्ट रोड स्थानकाच्या उजवीकडे खाली नजर टाकली तर एक ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानक दिसतं. याच ठिकाणी डेक्कन ओडिसी व तत्सम ट्रेन विसावा घेताना दिसतात. लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी मुंबई सेंट्रल गाठणारे किंवा जेजे रुग्णालयात भरती असणाऱ्या नातेवाईकास भेटायला जाणारे प्रवासी सँडहर्स्टला उतरतात. डॉकयार्ड रोडजवळ असणारे माझगाव डॉक गाठण्यासाठीही अनेकांची लगबग सुरू असते. माझगाव हा ‘मत्स्यग्राम’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. तेथे एकेकाळी मोठ्या प्रमाणावर मत्स्यव्यवसाय होत असे. आंब्यांची लागवड आणि कुस्तीसाठीही हा परिसर प्रसिद्ध होता, अशा नोंदी न. र. फाटक यांच्या मुंबई नगरी या ग्रंथात आढळतात. माझगावची ही ओळख काळाच्या ओघात दुर्दैवानं गडप झाल्याने हार्बरच्या प्रवासातही त्याचं प्रतिबिंब दिसत नाही. याच प्रकारे खुणा पुसल्या गेल्या आहेत त्या गिरण्या व कारख्यान्यांच्या. एखाद्या चौकस प्रवाशानं रे रोड व कॉटनग्रीन स्थानकांदरम्यान नजर टाकली तर गिरण्यांच्या भग्नावस्थेतील इमारती अस्वस्थ करून सोडतात.
डब्यात कोणाच्या हातात भलीमोठी प्लास्टिकची पिशवी, केसपेपर, वैद्यकीय अहवाल वगैरे आढळल्यास समजून जावं की हा प्रवासी शिवडीला उतरणार. शिवडी स्थानकापासून टाटा, वाडिया आदी रुग्णालयं जवळ असल्यानं असे चिंताक्रांत प्रवासी दररोज हमखास आढळतात. वडाळा आणि गुरू तेगबहादूर नगर या स्थानकांदरम्यान डावीकडे जुन्या, टुमदार देखण्या इमारती आढळतात. तर त्याच्याच उजव्या हाताला लांबलचक झोपडपट्टी दिसते. या झोपड्या रेल्वेमार्गाच्या एवढ्या जवळ आहेत, की रेल्वे रुळ म्हणजे जणू या झोपड्यांचा उंबरठाच. ट्रेनला इथून काहीसं धीम्या गतीनं जावं लागतं. हार्बरवर जलदगती ट्रेन सुरू न होण्यामागे ही अतिक्रमणं आहेत, असं बोललं जातं. हार्बरवरील सर्वाधिक गर्दीचं स्थानक म्हणजे कुर्ला. टिळकनगरनंतर हार्बर थेट काटकोनात वळते व तिचा प्रवास नवी मुंबईच्या दिशेनं सुरू होतो. पूर्वी मानखुर्दपर्यंतच धावणारी ही उपनगरीय रेल्वे खाडीचं सात किलोमीटरचं अंतर पार करून वाशीपर्यंत पोहोचली आणि नवी मुंबई-पनवेल रेल्वेमार्गानं मुंबईला जोडलं गेलं. वाशी ते पनवेलपर्यंतची स्थानकं सिडकोने बांधली आहेत. या प्रवासात दोन्ही बाजूला नियोजित शहराच्या खुणा दिसतात. पनवेल स्थानकात पोहोचल्यानंतर काही मिनिटांची विश्रांती घेऊन सीएसएमटी, अंधेरी, ठाणे यापैकी कोणत्या तरी दिशेने ट्रेनचा उलट दिशेने प्रवास सुरू होतो!
२० लाख प्रवासी
हार्बर सेवेचा सीएसएमटी-गोरेगाव, पनवेल-अंधेरी, वाशी-ठाणे, जुईनगर-ठाणे तसेच, नेरूळ-उरण (तूर्तास खारकोपरपर्यंत) असा विस्तार झाला आहे. मुख्य हार्बरवर १४.५ लाख तर, ठाणे ट्रान्स हार्बरवर सहा लाख असे एकूण २० लाख प्रवासी दररोज येथून प्रवास करतात.
…आणि वेग वाढला
हार्बर मार्गावरील लोकलचा वेग आता वाढला असला, तरी काही वर्षांपूर्वी चिंताजनक स्थिती होती. हार्बरवरील वांद्रेसह अनेक भागात रुळांनजीक असलेल्या झोपड्यांची समस्या होती. वांद्रे येथील रुळांवर तर झोपड्यांमधील रहिवाशांचा मोठ्या प्रमाणात वावर असायचा. त्यामुळे लोकलचा विलंब ठरलेला होता. तेव्हा मध्य रेल्वेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर पवित्रा घेतला. ही समस्या दूर न झाल्यास हार्बर सेवा थांबविण्याचा इशाराच रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला. तेव्हा राज्य सरकारला जाग आली आणि परिस्थिती सुधारली.
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/visiting-mumbai-on-harbor/articleshow/74423915.cms