मुंबई बातम्या

मुंबईत ९ मार्चपर्यंत जमावबंदी; पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही! – Maharashtra Times

मुंबईत ९ मार्चपर्यंत जमावबंदी; पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही!
मुंबई: दिल्लीत अलीकडंच उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत येत्या ९ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी तसे आदेश जारी केले आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) मुद्द्यावरून दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात ४२ हून अधिक बळी गेले आहेत. आता तिथं दिल्लीत तणावपूर्ण शांतता असली तरी त्याचे पडसाद इतरत्र उमटू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून सीएएच्या मुद्द्यावर मोर्चे निघत आहेत. त्यातून काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्यानुसार ९ मार्चपर्यंत मुंबईत कुठल्याही प्रकारचा मोर्चा काढण्यावर बंदी असेल. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. जमाव करून ध्वनीवर्धकाचा वापर करता येणार नाही. पोलिसांच्या पूर्वपरवानगीनंतर अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या कार्यक्रमाला परवानगी मिळणार आहे.

वाचा: ‘देशद्रोहाच्या कलमाला घाबरण्याचे कारण नाही’

या आदेशातून विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या व सहकारी संस्था बैठका, थिएटर, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम व संस्थांच्या नियमित सभांना वगळण्यात आलं आहे.

लहान विमानं व ड्रोनवर बंदी

मुंबई शहर व उपनगर क्षेत्रात २४ मार्चपर्यंत ड्रोन किंवा छोट्या विमानांना बंदी असेल. मुंबई विमानतळाच्या परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, मायक्रोलाइट विमान उडवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

वाचा: मुलुंडमध्ये ज्येष्ठ नागरिकाची हत्या

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-public-gatherings-banned-in-city-upto-9th-march/articleshow/74411290.cms